Site icon police varta

Three arrested with pistol, live cartridges in Panvel । navi mumbai police

पनवेलमध्ये पिस्टल, जिवंत काडतुसांसह तिघे गजाआड
हवालदार अनिल मांडोळे यांच्यामुळे गुन्ह्याची उकल

पनवेल: नेरे परिसरात अनधिकृत शस्त्रांची विक्री करण्याचा प्रयत्न करत असलेल्या तिघांना नवी मुंबई गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. आरोपींकडून दोन देशी पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, ही कारवाई अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस हवालदार अनिल मांडोळे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे १५ डिसेंबर रोजी करण्यात आली.

गुप्त माहिती मिळाली की, काही इसम हॉटेल न्यू रॉयल कॅफे, नेरे येथे पाच लाख रुपयांच्या किमतीची पिस्टल विक्रीसाठी येणार आहेत. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अलका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सापळा लावण्यात आला.

तीन आरोपींना अटक

सापळा लावून बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यावर कारवाई करण्यात आली. मारुती स्विफ्ट कारमधून किशोर दत्ता धाडी (वय २४, रिक्षाचालक), ऋषीकेश रघुनाथ लोटे (वय २५, नोकरी), यशवंत बबन सत्रे (वय २४, रिक्षाचालक) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान या आरोपींकडून दोन देशी पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली. या दरम्यान मोटारसायकलवरून आणखी एक संशयित अर्जुन जाधव घटनास्थळावरून पळून गेला असून, त्याच्याकडे पाच जिवंत काडतुसे असल्याचे या आरोपींच्या चौकशीत उघड झाले आहे.

गुन्हा नोंद आणि पुढील तपास सुरू

पनवेल तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ आणि बीएनएसक ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अटक आरोपींना न्यायालयाने १८ डिसेंबर २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी शस्त्रं कोठून मिळवली आणि ते कोणाला विक्रीसाठी होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलीस यंत्रणेचे मोठे यश

अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त अमित काळे, सहायक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अलका पाटील आणि त्यांच्या टीमने ही यशस्वी कारवाई केली. पथकात पोलीस हवालदार अनिल मांडोळे, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, कोलते आणि चालक शिंदे यांचा समावेश होता.

Exit mobile version