Site icon police varta

२४ तासांत ऑनलाईन लुटलेले १ कोटी वाचवण्यात यश। Successfully saved 1 crore looted online in 24 hours

पुन्हा एकदा रेकॉर्ड ब्रेक कर्तव्य!
मुंबईच्या सायबर सेल पोलिसांची आणखी एक उल्लेखनिय कारवाई

मुंबई : गेल्या २४ तासांत ऑनलाईन लुटलेली १ कोटी रुपयांहून अधिक रक्कम वाचवण्यात मुंबईच्या सायबर सेल पोलीस पथकाला यश आले आहे. ही लवकरच संबंधितांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारे चालू वर्षांत सायबर सेल पोलिसांनी आतापर्यंत ११४ कोटी रुपये फ्रिज करण्यात यश मिळविले आहे.

विद्युत बिल भरण्यासाठी, पार्ट टाईम जॉब, झटपट श्रीमंत होण्यासाठी ट्रेडिंगद्वारे नफा यांसह एकाद्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवत फोनवरून पैसे उकळण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. या कारणांना गेल्या २४ तासात मुंबईतील अनेक जण बळी पडले. त्यांच्या खात्यातून भामट्यांनी १ कोटी १ लाख ५८ हजार ७२७ रुपये लुटले. याबाबत तक्रारी येताच सायबर सेलचे उपायुक्त दत्ता नलावडे, एसीपी आबुराव सोनवणे, पश्चिम प्रदेशीक सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, निवृत्ती बावस्कर, महिला हवालदार राणे, वालावलकर, हवालदार राऊळ, अंमलदार पाटील आदी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान हाती लागलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे भामट्यांनी ऑनलाईन पळवलेले १ कोटी १ लाख ५८ हजार ७२७ रुपये पोलिसांनी वाचवले.

‘१९३०’ ठररतेय संजीवनी
ऑनलाईन लुटीचे वाढते गुन्हे लक्षात घेत सायबर सेल पोलिसांनी १९३० ही हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनवर २४ तासांत नागरिकांनी फोन करून ऑनलाईन फसवणूक झाल्याची माहिती दिली. त्यानुसार सायबर सेलच्या पथकाला पैसे वाचवण्यात यश आले. मुळात कुठल्याही सोशल मीडियावरील लिंकला क्लिक करू नका. आपल्या मोबाईलवर एसएमएसद्वारे येणारा ओटीपी शेअर करू नका. आपली बँक डिटेल कोणाला सांगून नका. न कळत आपण भामट्यांच्या जाळ्यात अडकल्याने पैसे गमावल्यास त्वरित १९३० क्रमांकावर फोन करा, असे आवाहन या गुन्ह्यांच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Exit mobile version