विश्वासघातकी मोलकरीण मुंबई पोलिसांच्या जाळ्यात!
४४ गुन्ह्यांचा धक्कादायक इतिहास
मुंबई : नवी मुंबईतील एका प्रतिष्ठित सोसायटीत घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाचा विश्वासघात करत लाखोंच्या चोरीचा कट रचला. त्यांच्या घरातून सोन्याचे 54 ग्रॅम दागिने आणि 3 लाख 49 हजारांची रोकड चोरल्याप्रकरणी आरोपी वनिता उर्फ आशा शैलेंद्र गायकवाड (वय 38) हिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या महिलेला पुढील तपासासाठी नवी मुंबईतील वाशी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्ह्याचा तपशील
25 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान, फिर्यादी यांच्या बेडरूममधील लाकडी कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेली. फिर्यादींनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर कक्ष-7 गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली. पोलीस हवालदार बल्लाळ यांना गुप्त माहिती मिळाल्यामुळे आरोपी महिलेचा माग काढण्यात आला.
चौकशीदरम्यान अनेक गुन्ह्यांचा उलगडा
गुन्ह्यांची कबुली देताना वनिता गायकवाडने या गुन्ह्यासोबत इतर अनेक चोरीचे गुन्हे कबूल केले. तपासादरम्यान समोर आले की, तिच्यावर वाशी, बांद्रा, वर्सोवा, जुहू, सांताक्रूझ अशा अनेक पोलीस ठाण्यांमध्ये चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.
आतापर्यंत केलेले गुन्हे
जुहू: 12
खार: 9
बांद्रा: 5
सांताक्रूझ: 4
वर्सोवा: 3
मरीन ड्राईव्ह, अंबोली, ओशिवरा, ताडदेव, ट्रॉम्बे: अनुक्रमे 1 ते 2 असे एकूण ४४ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीस टीमचे कौतुक
सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक काळे, परबळकर, हवालदार पवार, बल्लाळ, आणि महिला पोलीस तिरोडकर यांनी केली.