दलालाच्या ४ महिन्यांच्या मुलाच्या अपहरणामुळे बांगलादेशी महिलांना भारतात वेश्याव्यवसायासाठी आणणाऱ्याचा पर्दाफाश
डोंबिवली : बांगलादेशी महिलांना गारमेंटमध्ये कामाला लावण्याचे आमिष दाखवून भारतात छुप्या मार्गाने आणून वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या दलालाचा पर्दाफाश झाला आहे. बळी पडलेल्या १७ वर्षीय मुलीने वैतागून दलालाच्या ४ महिन्यांच्या मुलाचे अपहरण केल्याने दलालाचे बिंग उजेडात आले. या गुन्ह्याची उकल ठाणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखा २ च्या पथकाने केली.
काही दिवसांपूर्वी दोन बहिणींना भारतात आणले होते. या महिलांपैकी एकीच्या १७ वर्षीय मुलीलाही दलालाने भारतात आणले. आई व मावशीला जिवंत बघायचे असल्यास मी सांगेल ते करावे लागेल, अशी धमकी दलालाने त्या मुलीला दिली. घाबरलेल्या मुलीचे दलालाने नग्न फोटो व व्हिडीओ शूट करून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यास सुरुवात केली. गेली दोन-तीन महिने ती मुलगी अत्याचार सहन करत होती. रोजच्या अत्याचाराला वैतागून त्या मुलीने डोंबीटिवलीतून दलालाच्या ४ महिन्यांच्या बाळाचे अपहरण केले. मुलाला पळवल्याचे उघडकीस येताच त्याने मानपाडा पोलीस ठाणे गाठले. दरम्याम, मुलाचे अपहरण करणारी मुलगी भिवंडी एसटी स्टॅण्ड येथे असल्याची माहिती सपोनि धनराज केदार, हवालदार अमोल देसाई यांना प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज केदार, हवालदार अमोल, हवालदार माया डोंगरे व अन्य पोलिसांनी त्या मुलीला बाळासह ताब्यात घेतले.
मुलीची चौकशी केली असता तिने बांगलादेश ते भारतात येईपर्यंत घडलेला सर्व प्रसंग सांगितला. राज उर्फ सतीश रजाक व त्याची पत्नीने दलालाच्या मदतीने तिला व तिच्या आई, मावशीला गारमेंट कंपनीमध्ये कामाला लावण्याचा बहाणा करून भारतात चोरट्या मार्गाने आणल्याचे तिने सांगितले.
या प्रकरणाच्या तपासासाठी मुलीला, अपह्रत बाळाला मानपाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. राज याने अशा प्रकारे आणखी कोणाला भारतात आणले आहे का? याचा तपास मानपाडा पोलीस करत आहेत.