फायनान्स कंपनीची रोकड चोरीला गेल्याचा बनाव करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक;
कर्मचाऱ्याला अटक; मुलुंड पोलिसांची कौतुकास्पद कारवाई
✒️ अशोक ओवाळ
मुंबई : फायनान्स कंपनीची रोकड दोन चोरांनी चोरून नेल्याचा बनाव करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलुंड पोलिसांनी (Mulund Police) पर्दाफाश केला. या आरोपीने काही रक्कम शेअर मार्केटमध्ये(stock market through ford) गुंतवल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले आहे.
अमित रामआशिष गुप्ता (वय २१ वर्षे, धंदा नोकरी, रा.ठी. रूम नं. २२ सुखराम शेठ चाळ, रामनगर, टेंभीपाडा, भांडुप (प), मुंबई) हा युनिटी शेअर सर्विस या कंपनीत काम करतो. कंपनीची रक्कम घेऊन जात असताना दोन चोरांनी त्याला मुलुंड पश्चिम परिसरातील विरसंभाजी नगर पाईपलाईन येथे अडवून त्याच्याकडील ८५ हजार ७९० रुपये ठेवलेली बॅग पळवली. या प्रकरणी (गु.र.क. ३४/२०२५, कलम ३०४, ३(५) भा. न्या.स. अन्वये) गुन्हा नोंद करण्यात आला.
वरिष्ठांच्या सूचनांनुसार गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते व पथकांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. फिर्यादी अमितने दिलेल्या तक्रारीत तफावत आढळल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची उलट तपासणी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. लुटलेल्या रकमेपैकी ५० हजार रुपये त्याने शेअर मार्केटमध्ये गुंतवले होते व उर्वरत रक्कम घरात ठेवली होती.
या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त, सत्यनारायण चौधरी, (कायदा व सुव्यवस्था), अपर पोलीस आयुक्त महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ७, मुलुंड विजयकांत सागर, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मोरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन खाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते, हवालदार किरण चव्हाण, अंमलदार सुनील विंचु,शेखर बाविस्कर,मनोज मोरे, मोहन निकम,विवेक शिंपी यांनी केला.