बेस्ट बसमध्ये प्रवाशाचा ४ लाख ४८ हजारांचा ऐवज चोरणारा अटकेत
सपोनि लिलाधर पाटील यांच्यामुळे गुन्ह्याची उकल
मुंबई : बेस्ट बस प्रवासादरम्यान ४ लाख ४८ हजारांचा सोन्याचा ऐवज चोरणाऱ्याला अटक करण्यात आली. सदर कारवाई मुंबईच्या आझाद मैदान पोलिसांनी (Azad Maidan Police) केली. या कारवाईत चोरला गेलेला १०० टक्के मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जयंता सोमय्या पुजारी (वय 47 वर्ष, धंदा – नोकरी , रा. ठी. रूम नंबर 142, गणेश मूर्ती नगर 2, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग बस डेपोजवळ कफ परेड मुंबई) हे कुलाबा बस डेपो ते डी.एन रोड वरील पिके वाईन समोरील 9 नंबर बस मार्गावरील स्टॉप या प्रवासादरम्यान प्रवास करत होते. त्यावेळी त्यांच्या बॅगेतून सोने व हिरे असा एकूण ४ लाख ४८ हजारांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी (गु.र.क्र 132/2024 कलम 379) गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्याचा तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी सपोनि लीलाधर पाटील यांना खबऱ्याने आरोपीची माहिती दिली. त्यानुसार आरोपी मोहम्मद शमीम यामीन कुरेशी (वय 40 वर्ष,धंदा फ्रुट विक्रेता रा.ठी झोपडा नंबर 115,मिलन नगर, शुक्ला कंपाउंड पाईपलाईन पवई मुंबई) याला पवईतून अटक करण्यात आली. या कारवाईत त्याच्याकडून चोरलेले 3 लाख 80 हजारांचे 4.5 कॅरेट वजनाचे हिरे, 43 हजारांचे 1.27 कॅरेट वजनाचे हिरे, 25 हजारांची 5.97 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन जप्त करण्यात आली. हा आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध एल. टी. मार्ग, भायखळा, कुलाबा, ताडदेव, भोईवाडा, पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई परिमंडळ-1 चे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील, अंमलदार कटरे, हिरे, पाटील, कीर्तीकर, मुंढे यांनी केली.