केअर टेकर ठेवताना सावधान!
जुहूमध्ये ८१ वर्षीय महिलेचा गळा आवळून परिधान केलेला सोन्याचा ऐवज लुटणारा जेरबंद
मुंबई : मलबार हिल परिसरात नोकराने खून केल्याची घटना नुकतीच घडली असताना जुहू परिसरात केअर टेकरने ८१ वर्षीय महिलेला भिंतीवर ठकलले व तिचा गळा आवळून सोन्याचा ऐवज पळवला. या आरोपीला अवघ्या ४८ तासांच्या आत जेरबंद करण्यात जुहू पोलिसांना यश आले आहे.
गुन्ह्याचा घटनाक्रम
जुहूतील उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या कुंजबाला अशोक मेहता यांच्या देखभालीसाठी अंकित पाटील (35 वर्षे धंदा- वेटर काम रा.ठी. 001, पुष्पलता अपार्टमेंट कात्रज रोड, बदलापूर पूर्व,ठाणे) याला ठेवण्यात आले होते. 14 मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बेडरूमच्या बाथरूममध्ये कुंजबाला गेल्या असता पाटील याने त्यांना भितीवर ढकलले व त्यांचा गळाआवळून जबरदस्तीने हातातील बांगड्या, चैन काढून पळ काढला. या प्रकरणी (गुरक्र 282/2024, कलम 397 भादंवि) गुन्हा नोंदविण्यात आला.
या गुन्ह्याचा तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान कामाठीपुरा, ग्रँड रोड, डीबी मार्ग तसेच आझाद मैदान पोलीस ठाणे परिसरातील हॉटेल व लॉज मध्ये तपासणी करून कसून शोध घेतला असता आरोपीत हा न्यू मेट्रो गेस्ट हाऊस धोबी तलाव येथे असल्याचे समजले. त्यानुसार सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
चोरीस गेलेली मालमत्ता
पेंडल असणारी सोन्याची चैन १० ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे ५० हजार रुपये
१५ ग्रॅम वजनाची ७५ हजारांची सोन्याची बांगडी
एकूण किंमत १ लाख २५ हजार
तपासी पोलीस पथक
या गुन्ह्याचा तपास परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त राज रोशन तिलक, एसीपी महेश मुगुटराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस निरीक्षक प्रमोद कांबळे, तानाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रंजीत चव्हाण, गणेश जैन, एएसआय तोडणकर, हवालदार गजानन पाटील, घाडीगावकर, सिद्धप्पा टोकरे, महागडे, खोमणे, नितीन मांडेकर, अंमलदार मलकप्पा कणमुसे, तुषार पन्हाळे, अनिल तायडे, तासगावकर, बोडके यांनी केला.