Site icon police varta

परवाच्या पावसामुळे पोलिसांनी गमावला सहकारी । Amit Gondke of Mumbai Railway Police passed away after falling from the train

धावत्या रेल्वेतून पडल्याने मृत्यू

मुंबई : परवा महामुंबईत झालेल्या धो धो पावसामुळे मुंबईची लोकल सेवा कोलमडली. परिणामी घरी परतणाऱ्या लाखो प्रवाशांनी जीवावर उधार होत लोकलमध्ये लटक प्रवास केला. या प्रवासात मुंबई लोहमार्ग पोलीस दलात कर्तव्याला असलेले अंमलदार अमित ज्ञानेश्वर गोंदके (२८) यांनी जीव गमावला. कर्तव्य बजावून डोंबिवली येथील राहत्या घरी जाताना धावत्या लोकलमधून भांडुप-नाहुर स्थानकादरम्यान ते ट्रॅकवर पडले.

अमित गोंदके अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत होते. लोकलमधून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. दरम्यान, रात्रपाळीला भाडुंप स्थानकात कर्तव्याला असलेले सपोउपनि चव्हाण यांना २६ सप्टेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास भांडुप रेल्वे स्टेशनच्या दरम्यान एक व्यक्ती जखमी अवस्थेत ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार ते घटनास्थळी गेले. रेल्वे ट्रॅकच्या बाजूला त्यांना पोलीस गणवेश मिळाला. त्या व्यक्तीच्या खिशात सापडेल्या ओळखपत्रावरून त्याचे नाव अमित गोंदके (बक्कल क्र. १४६२) असून ते मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या अंधेरी रेल्वे ठाण्यात कर्तव्याला असल्याचे समजले. अधिक चौकशीत तो सन २०१८ साली पोलीस खात्यीत भरती झाल्याचे समजले. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

अमित यांचा विवाह झाला नव्हता. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि दोन भाऊ असून त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी नगर जिल्ह्यातील (ता. अकोले) कळंब या मूळगावी नेण्यात आला. तेथे शासकीय इतमामात अमितवर अंत्यसंस्कार करण्यात
आल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले. एक चांगला सहकारी गमावल्याने पोलीस खात्यातील अनेकांनी शोक व्यक्त केला.

Exit mobile version