विरार पोलिसांची मोठी कामगिरी: २३.९६ लाखांच्या मालमत्तेचा तक्रारदारांना परतावा
११ गुन्ह्यांची उकल: सोन्याचे दागिने आणि मोबाईल तक्रारदारांना परत
वसई : विरार पोलीस ठाण्याने चोरी, घरफोडी, जबरी चोरी, आणि गहाळ मोबाईल प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत, ११ गुन्ह्यांची उकल करून तब्बल २३ लाख ९६ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल तक्रारदार आणि नागरिकांना परत केला.
गेल्या काही दिवसांपासून विरार पोलीस ठाण्यात चोरी, घरफोडी, जबरी चोरीच्या गुन्ह्यांसह रहिवाशांचे मोबाईल गहाळ झाल्या प्रकरणी अनेक तक्रारी नोंदविण्यात आल्या होत्या. या गुन्ह्यांचा तपास करून विरार पोलिसांनी ११ गुन्ह्यांची उकल करुन ४ लाख ९६ हजार १९६ रुपयांचे १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व इतर ७ वाहने हस्तगत केली आहेत. तसेच भारत देशातील वेगवेगळ्या राज्यांमधुन तसेच महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्हयामधुन गहाळ/मिसींग झालेले वेगवेगळ्या कंपनीचे एकूण २६ मोबाईल फोन जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
२६ मोबाईल नागरिकांना केले परत
भारत आणि महाराष्ट्रातील विविध राज्यांमधून गहाळ झालेल्या वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण २६ मोबाईल फोन परत मिळवण्यात गुन्हे प्रकटीकरण पथक यशस्वी झाले. १६ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित हस्तांतर कार्यक्रमात संबंधित मालमत्ता तक्रारदारांना पोलीस उप-आयुक्त जयंत बजबळे आणि सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.
कारवाई करणारे पथक
सदर कारवाई मिरा भाईंदर वसई विरारचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त, बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रतापराव कदम, पोलीस निरीक्षक (प्रशासन) अमित ताड, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश हाटखिळे, हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, नितेश पाटील, संदिप शेरमाळे, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, अंमलदार मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, प्रफुल सोनार, उत्कर्ष सोनावणे व सहाफौज शेख, महिला अंमलदार गडकरी, उपायुक्त कार्यालयातील हवालदार नामदेव ढोणे, अंमलदार सोहेल शेख यांनी केली आहे.
मोबाईल चोरणाऱ्या महिला चोरांची बातमी वाचा…
रुग्णालयात, बसमध्ये मोबाईल चोरणाऱ्या महिलांना अटक
२१ मोबाईल जप्त करण्यात जे जे मार्ग पोलिसांना यश