मुंबई पोलिसांनी पिस्तूलसह दोघांना ठोकल्या बेड्या
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) मुंबई दौ-यावर असल्याने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वच पोलीस यंत्रणा सतर्क असताना घाटकोपरमध्ये पिस्तूल बाळगणारे दोन जण पोलिसांच्या हाती लागले. ही कारवाई पंतनगर पोलिसांनी (Pantnagar Police) केली. मोहम्मद मुनीष मोहम्मद महमदिन खान उर्फ टरा (वय ३४ वर्ष, धंदा रिक्षाचालक, रा.ठी. समन बेकरीच्या बाजूला हिमालया हॉटेल जवळ, धारावी पश्चिम, मुंबई), मोहम्मद मुकद्दर मोहम्मद अनिस पठाण (वय 24 वर्ष, धंदा बेरोजगार, राठि गाव अकबरपुर, पोस्ट इब्राहिमपूर, तालुका घुंगुरापूर, जिल्हा कनोत, राज्य उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून गावठी कट्टा (किंमत १० हजार रुपये), दीड हजार रुपयांचे ३ काडतुसे व रिक्षा जप्त करण्यात आली. सदर गावठी कट्टा यूपीतून आणल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.
अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे (Atal Bihari Vajpayee Shivdi-Nhava Sheva of Atal Setu) लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते १२ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभराात तगडा बंदोबस्त तैनात आहे. प्रत्येक पोलीस दल आपापल्या परीने विशेष मोहीम राबवत असताना मुंबईच्या पंतनगर पोलिसांना पिस्तूल बाळगणाºयाची माहिती प्राप्त झाली. त्या माहितीच्या आधारे ११ जानेवारी रोजी पोलिसांनी घाटकोपर परिसरातील रेल्वे पोलीस पेट्रोल पंप येथे सापळा लावला. त्यावेळी तेथे रिक्षा आली. त्यातील चालकासोबत असलेल्या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्या दोघांची चौकशी करत अंगझडती घेतली असता गावठी कट्टा आढळून आला. विना परवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी (गु. र. क्र. ३/२०२४) भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ नुसार गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. जप्त केलेला गावठी कट्टा कोणाला विकणार होते, याचा तपास पोलीस करत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई परिमंडळ ७ चे उपायुक्त पुरुषोत्तम कराड, घाटकोपर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक निकम, पंतनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश केवळे, गुन्हे प्रकटीकरणचे पोलीस निरीक्षक संतोष कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक ताकमोगे, जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, प्रकाश शिंदे, हवालदार अनुसे, चव्हाण, अंमलदार दळवी, पवार यांनी केली.