महाराष्ट्रात मोबाईल चोरण्यासाठी येणाऱ्या कर्नाटक, तेलंगणाच्या चोरांना ठोकल्या बेड्या
४२ मोबाईल जप्त
कल्याण, डोंबिवली, ठाणे हद्दीतील २३ गुन्ह्यांची उकल
मुंबई : कल्याण, डोंबिवली व ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या कर्नाटक व तेलंगणाऱ्या आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेच्या पथकाने केली. हे चोर हाती लागल्याने २३गुन्ह्यांची उकल झली असून ४२ मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
रेल्वेप्रवाशांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी चोरांना अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस विशेष मोहीम राबवून आरोपींवर लक्ष ठेवू लागले. शोधमोहीम सुरू असताना मोबाईल चोरणाऱ्या दोन जणांची माहिती खबऱ्याने दिली. त्या माहितीच्या आधारे कल्याण रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावून चिन्ना व्यंकटेश पुसला (वय 32 वर्षे, मुळगांव, हुबळी, जि धारवाड, राज्य कर्नाटक), अशोक हणमंता आवुला (वय 25 वर्षे, राह. मुळगांव ता. एल. बी. नगर, जि. रंगारेडडी, राज्य तेलंगणा / सध्या दोघेही राह. दहिसर मोरी, शिळफाटा, ता कल्याण जि ठाणे) यांना अटक केली. या दोघांची कसून चौकशी करून ६ लाख ७९ हजार ३७ रुपयांचे ४२ मोबाईल जप्त केले. यापैकी कल्याण, डोंबिवली व ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या २३ गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच इतर १९ मोबाईल शहर भागात व गर्दीच्या रेल्वे स्थानकांत चोरल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई मध्य लोहमार्ग परिमंडळचे उपायुक्त मनोज पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे सपोनि मगेश खाडे, कल्याण लोहमार्ग गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, सपोउपनिरी संदिप गायकवाड, अंमलदार प्रमोद दिघे, रविंद्र ठाकूर, लक्ष्ण वळकुंडे, अजय रौंधळ, स्मीता वसावे, राम जाधव, वैभव जाधव, हितेश नाईक, अक्षय चव्हाण, रूपेश निकम, सायबर सेलचे अंमलदार विक्रम चावरेकर, अमोल अहिनवे, संदेश कोंडाळकर यांनी केली.
रेल्वे प्रवाशांना जाहीर आवाहन
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोहमार्ग पोलीस नेहमीच सतर्क असतात. मात्र, सुजान प्रवासी म्हणून प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान मुद्देमालाची काळजी घेतली पाहिजे. प्रवास करताना संकट आल्यास मदतीसाठी १५१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी प्रवाशांना केेले आहे.