प्रॉपर्टी बळकावण्याचा भोंदूबाबाचा कट उधळला
दहिवडी पोलिसांची उल्लेखनिय कारवाई
सातारा : प्रॉपर्टी बळकावण्याचा भोंदूबाबाचा कट उधळण्यात आला. ही उल्लेखनिय कारवाई सातारा जिल्हा पोलीस दलाच्या दहिवडी पोलिसांनी केली.
जमीन हडपण्यासाठी २७ वर्षांनंतर बनावट मुलगा म्हणून परतला भोंदू बाबा; पोलिसांच्या धाडसी कारवाईने उघड झाला प्रकार!
सातारा जिल्ह्यातील शिंदी बुडा (ता. माण) गावात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. व्दारकाबाई विष्णु कुचेकर यांचा मुलगा १९९७ साली घर सोडून गेला होता. तेव्हापासून व्दारकाबाईंनी आपल्या मुलाची वाट पाहत आयुष्य व्यतीत केले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एका भोंदू बाबाने आपल्याच मुलाचा वेश धरून तिच्या भावनांचा फायदा घेतला.
भोंदू बाबा ‘मुलगा’ कसा बनला?
नऊ-दहा वर्षांपूर्वी शिंदी बुडा गावात भीक मागण्यासाठी आलेल्या एका भोंदू बाबाला व्दारकाबाईंच्या घराची व जमिनीची माहिती मिळाली. त्यानेच आपण त्यांचा हरवलेला मुलगा सोमनाथ विष्णु कुचेकर असल्याचा दावा केला. वृद्ध व्दारकाबाईंनी मायेपोटी त्याच्यावर विश्वास ठेवला. दरम्यान, व्दारकाबाईंच्या मृत्यूनंतर (९ डिसेंबर २०२३) तो त्यांच्या नावावरची तीन एकर जमीन हडपण्याचा डाव आखत होता.
कागदपत्रे बनवून फसवणूक
भोंदू बाबा, खरा नाव एकनाथ रघुनाथ शिंदे (रा. ओझर बुगा, ता. जामनेर, जि. जळगाव) याने सोमनाथ कुचेकर असल्याचा बनाव करत बनावट कागदपत्रे तयार केली. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, एटीएम अशा सर्व गोष्टींसाठी त्याने सोमनाथचा नाव आणि पत्ता वापरला.
पोलिसांनी केला पर्दाफाश
११ डिसेंबर २०२४ रोजी व्दारकाबाईंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने भोंदू बाबाच्या कारस्थानाचा सुगावा नातेवाईकांना लागला. त्यांनी तातडीने दहिवडी पोलिसांना कळवले. पोलिसांनी तपास कौशल्य वापरून आरोपीला अटक केली. चौकशी दरम्यान, त्याने बनावटगिरीचा कबुलीजबाब दिला.
आणखी कोणाला गंडवले का?
पोलिसांनी गु.र.नं. ५६४/२०२४ अंतर्गत भोंदू बाबावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, अशीच फसवणूक अन्य कोठेही झाली असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी केले आहे.
पोलिसांचे आवाहन
वृद्ध व्यक्तींवर विश्वास ठेवून त्यांची फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सावध राहा. असे प्रकार उघडकीस आणण्यासाठी सतर्क राहा आणि पोलिसांना सहकार्य करा.
कारवाई करणारे पथक
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय सोनवणे सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक गुलाब दोलताडे पोलीस हवालदार सचिन चावरे, श्रीनिवास सानप, पोलीस कॉन्स्टेबल निलेश कुदळे, महिंद्र खाडे यांनी केली आहे.