Site icon police varta

Rajasthan gang busted for stalking and robbing APMC traders

एपीएमसीच्या व्यापाऱ्यांचा पाठलाग करून लुटणाऱ्या राजस्थानच्या टोळीचा पर्दाफाश

नवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ च्या कारवाईत ७ गुन्ह्यांची उकल

नवी मुंबई : नवी मुंबईत व्यापाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्या कारच्या काचा फोडून मुद्देमाल पळवणाऱ्या राजस्थानच्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने केली. या कारवाईमुळे ७ गुन्हे उघडकीस आले आहेत. तपासादरम्यान मोटरसायकल, एक सेलोरीओ कार, पत्नीच्या खात्यातील फिज केलेली रक्कम असा एकूण १३ लाख ६४ हजार ५२ रुपयांचा मुद्दे‌माल जप्त करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये एपीएमसी मार्केट तसेच इतर मार्केटमधील व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांच्या कारचा पाठलाग करुन पार्क केलेल्या कारच्या काचा फोडून त्यातील पैशांची बॅग चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे नवी मुंबई परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली. यामुळे वाढलेली पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय ऐनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त अमित काळे, एसीपी अजयकुमार लांडगे यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शाखा २ च्या पथकाने घटनास्थळांना भेटी देत आरोपींचा शोध सुरू केला. अशा प्रकारचे गुन्हे करणारी आंतरराज्यीय टोळी नवी मुंबई परिसरात सक्रिय झाल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू असताना १९ मार्च २०२४ रोजी आरोपी घणसोली परिसरातील व्यापाऱ्याला लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा लावून या टोळीतील अजय गोपाळ चौहान (३८, रा, कल्याण- शिळ रोड, खिडकाळी, ता. जि.ठाणे मुळ राहणारा राजस्थान), रोहन अशोक कंजर ( २४ , रा. कोपरखैरणे, नवी मुंबई, मुळचा राजस्थान) यांना ताब्यात घेतले.

हे आरोपी स्कुटीच्या नंबर प्लेट काढून मार्केट परिसरात व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांचा मुद्देमाल पळवत होते. चोरी केल्यानंतर दुस-या परिसरात जावून कपडे बदलून, स्कुटीला नंबर प्लेट लावून पैशाची आपसांत वाटणी करुन वेगवेगळया दिशेने निघून जात असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले.
आरोपींनी मोटारसायकल, चोरीच्या पैशातून खरेदी केलेली मारूती सेलोरीओ कार हस्तगत केली. तसेच चोरलेल्या पैशांतून सोन्याचे दागिने बनवल्याचेही निष्पन्न झाले. साथीदार संतोष चौहान, विशाल सिंह व अनिकेत उर्फ लाला चारी (सर्व राह. भरतपूर, राजस्थान) यांच्या सहायाने केल्याची कबुली दोघांनी दिली. हे आरोपी हाती लागल्याने न्हावाशेवा, एपीएमसी, सानपाडा, पनवेल शहर, नेरुळ, खारघर पोलीस ठाण्यातील ७ गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही उल्लेखनिय कारवाई गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण फडतरे, पोउपनि मानसिंग पाटील, दिलीप भंडे, सुनिल गिरी, हवालदार मधुकर गडगे, तुकाराम सूर्यवंशी, रणजित पाटील, रमेश शिंदे, अनिल पाटील, अजित पाटील, निलेश पाटील, सागर रसाळ, दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, राहुल पवार, जगदिश तांडेल, पोलीस नाईक आजिनाथ फुंदे, विक्रांत माळी, नंदकुमार ढगे, अमोल मोहिते, अदिती काकडे यांनी केली.

Exit mobile version