सांगलीत एमडीच्या कारखान्यावर धाड
- गुजरात, मुंबईच्या आरोपींना अटक
- मुंबईत ड्रग्ज नेताना केलेल्या कारवाईत २९ कोटींचा मुद्देमाल जप्त
- हवालदार सागर टिंगरे यांच्यामुळे तस्करीचा पर्दाफाश
सांगली : जिल्ह्यात एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावर (Raid on MD's factory in Sangli) धाड टाकण्यात आली. तेथे तयार केले ड्रग्ज मुंबईत विकण्यासाठी नेले जात होते. ही कौतुकास्पद कारवाई हवालदार सागर गिरीजापती टिंगरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगली जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. या कारवाईत २९ कोटी ७३ लाख ५५ हजार २०० रुपसांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कारवाईदरम्यान हाती लागलेले आरोपी गुजरात, मुंबई व विटा येथील रहिवासी असल्याचे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.
महाराष्ट्र पोलीस दलातर्फे नशामुक्त अभियान सुरू आहे. त्या अंतर्गत कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अधीक्षक, संदीप घुगे यांनी अंमली पदार्थांची विक्री, तस्करी, साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व पोलीस पथकाने कारवाईसाठी विशेष मोहीम हाती घेतली. या अंतर्गत गुन्हे शाखेचे पथक तस्करांवर लक्ष ठेवून असताना हवालदार सागर टिंगरे यांना खबऱ्याने अमलीपदार्थ तस्करी करणाऱ्यांची माहिती दिली. त्यानुसार विटा हद्दीतील कार्दै एमआयडीसी, रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी सापळा लावून एकाला ताब्यात घेतले.
त्याची चौकशी केली असता त्याने स्वत:चे नाव बलराज अमर कातारी (वय २४ वर्ष रा. साळशिंगे रोड आयटीआय कॉलेज जवळ, विटा) असे सांगून रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केलेला मेफॅड्रॉन (एम.डी) नावचा अमंली पदार्थ प्लॅस्टिक पिशवीमध्ये भरून मुंबईत विकण्यास नेत असल्याचे सांगितले. तसेच ड्रग्ज बनवणारे
राहुदिप धनजी बोरीचा (वय ४१ वर्षे, रु. श्री रेसिडेन्सी, रुम क्र. २२, उत्तरदरा कोसंबा, ता. भरुच, जी. सुरत राज्य गुजरात), सुलेमान जोहर शेख (वय ३२ वर्ष, रा. मौलाना दादा लेन, दर्गाह गल्ली, बांद्रा, वेस्ट मुंबई) यांची माहिती दिली. त्यानुसार त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कारखान्याची झडती घेतली असता पांढरे रंगांची गाडी, एम.डी बनविण्याकरीता वापरलेले साहित्य आढळले. या कारवाईत एकूण २९ कोटी ७३ लाख ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी गु.र.क्र. ५२/२०२५ NDPS कायदा कलम ८(अ) २१(क), २९ नुसार विटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मोठे रॅकेट येणार उजेडात
रहुदिप बोरिचा हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचे बीएससी केमेस्ट्री शिक्षण झाले असून त्यास केमीकल प्रॉडक्शन बाबत चांगली माहिती आहे. तसेच महिन्याभरापासून त्याने व बलराज कातारी, सुलेमान शेख यांनी हा कारखाना ३० हजार रुपये प्रति महिना भाडेत्त्वावर घेतला होता. आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांचेवर विटा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या गुन्ह्यामुळे मोठे रॅकेट उजेडात येण्याची वर्तवली जात आहे.