नांदेड-ठाणे गांजा तस्करीचा पर्दाफाश;
👉सपोनि धनराज केदार यांच्यामुळे १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाणे : नांदेडहून गांजा विकण्यासाठी आलेल्या तस्कराचा पर्दाफाश (Nanded-Thane ganja smuggling busted) करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि धनराज केदार यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा २ च्या पथकाने भिवंडीतील मामा भांजा दर्गा येथे केली. या कारवाईत २५ किलो ९६४ ग्रॅम गांजा, रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण १२ लाख ९० हजार ७६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ठाणे शहर ड्रग्जमुक्त ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कारवाया करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा घटक २ चे पथक ड्रग्ज तस्करांचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांना गांजा तस्करी करणाऱ्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तातेराव बाळीराम गवते (वय २७ वर्षे, रा.मु.पो पेनुर, ता. लोहा, जि. नांदेड) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून २५ किलो ९६४ ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात (गुन्हा नोंद क्रमांक । १०४/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (।।) क) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध- १) शेखर बागडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक /जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीराज माळी, सपोनि धनराज केदार, पोलीस उपनिक्षक रविंद्र पाटील, सपोउपनि सुधाकर चौधरी, हवालदार सुनील साळुंखे, शशिकांत यादव, रंगनाथ पाटील, किशोर थोरात, प्रकाश पाटील, वामन भोईर, साबिर शेख, सचिन जाधव, माया डोंगरे, श्रेया खाताळ, अंमलदार अमोल इंगळे, भावेश घरत, उमेश ठाकुर, रविंद्र साळुंखे यांनी केली.