रेल्वेच्या गर्दीमुळे मुंबई पोलिसाचा मृत्यू
कर्तव्याला जाताना डोंबिवली-कोपर दरम्यान धावत्या गाडीतून पडले
डोंबिवली : कर्तव्याला जाण्यास निघालेल्या २५ वर्षीय पोलीस अंमलदार रोहित रमेश किलजे यांचे धावत्या रेल्वेतून पडल्याने निधन झाले. ते ताडदेव ल विभागात कर्तव्याला होते. ते अनुकंपावर भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे.
रोहित हे नेहमी प्रमाणे डोंबिवली स्थानकात आले. फलाट क्रमांक ५ वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढले. प्रचंड गर्दीमुळे कोपर स्थानक येण्यापूर्वी ते धावत्या गाडीतून पडले. या अपघाताची माहिती प्राप्त होताच डोंबिवली लोहमार्ग पोलीस तात्काळ अपघातस्थळी गेले. जखमी अवस्थेत त्यांना केडीएमसीच्या शास्त्री रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी २६/२४ नुसार अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, दुपारनंतर रोहितचा मृतदेह अंत्यविधीसाठी रत्नागिरीतील (ता. चिपळुण) शिरगाव या मूळगावी नेण्यात आला आहे. या घटनेमुळे मुंबई पोलिसांसह राज्यभरातील अनेकांनी शोक व्यक्त केला.