रायगड पोलिसांची पुन्हा कौतुकास्पद कारवाई
रायगड : जिल्ह्यातील मौजे ढेकू गावातील कंपनीत टाकलेल्या धाडीनंतर मौजे होनाड गावातील गोदामातून आणखी २१८ कोटी रुपयांचे एमडी जप्त केले आहे. या कारवाईमुळे मोठे रॅकेट उघडकीस येणार असल्याची माहिती कोकण परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार यांनी दिली.
खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ढेकु गावचे हद्दीत मात्र अंचल केमिकल या नावाने केमिकल बनवण्याचा व्यवसाय करणा-या कंपनीमध्ये अंमली पदार्थ तयार केले जात असल्याच्या माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे खोपोली पोलिसांनी धाड टाकली होती. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात (गुन्हा रजि. क्र. ३६४/२०२३) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (C), २२ (C) सह कलम २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर कारवाईच्या वेळी पोलीसांनी १०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रुपये किंमतीचे अमलीपदार्थ तसेच त्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल जप्त केला होता. सदर गुन्ह्यात ३ आरोपींना अटक केली होती. सध्या या आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, खालापुर यांनी दि. १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपीने खोपोली पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील मौजे होनाड गाव, ता. खालापुर येथे एका गोडावुन मध्ये लपवुन ठेवलेला एकुण ७ बरेलमधील एकुण १७४.५ किलो वजनाचा रु. २१८ कोटी १२ लाख ५० हजार रुपये किंमतीचे एम. डी. म्हणजेच मेफेड्रॉन (Mephedrone) अंमली पदार्थ दि. १०/१२/२०२३ रोजी जप्त केलेले आहेत. तसेच गुन्ह्यातील अटक आरोपींनी काही अंमली पदार्थ हे परदेशात पाठवलेले असल्याची माहीती प्राप्त झाली असुन त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.
या पथकाला सलाम…
सदर कारवाई कोकण परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रविण पवार, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर, पोलीस उप निरीक्षक सुधाकर लहाने, अभिजीत व्हरांबळे, हवालदार सागर शेवते, प्रसाद पाटील, प्रशांत पाटील, प्रदीप कुंभार, संतोष रुपनवर, पोलीस नाईक लिंबाजी शेंडगे, सतीष बांगर, प्रवीण भालेराव, अंमलदार प्रदीप खरात यांनी केली.