police varata

मुंबईत मांडुळ सापाची तस्करी। Mandul snake smuggling in Mumbai


तेलंगणा, मुंबई, ठाण्याचे चौघे गजाआड
सपोनि अमित देवकर, पोउपनि रूपेश भागवत यांच्यामुळे गुन्ह्याची उकल

मुंबई : दुर्मिळ मांडुळ सापाची तस्करी करणाऱ्या तेलंगणा, मुंबई, ठाण्यातील आंतरराज्यीय टोळीतील चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मुंबईच्या कफ परेड पोलिसांनी केली.

कफ परेड पोलीस ठाण्यातील मेकर टॉवर जवळ काही इसम हे मांडूळ सापाची विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती सपोनि अमित देवकर व पोउपनि रूपेश भागवत यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने मेकर टॉवर परिसरात सापळा लावून MH 47 BT 2554 कारमधून आलेल्या चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या बॅगांची झडती घेतली असता त्यात ५ किलो वजनाचा व ५५ इंच लांब मांडूळ साप (Red Sand Boa) आढळला. सदर मांडुळ सर्पास Aarey Key Foundation चे सर्पमित्र गणेश गायकवाड यांच्या मदतीने ताब्यात घेऊन त्यास ठाणे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कफ परेड पोलीस ठाण्यात (गु. र.क्र. २२१/२४ कलम ३९(३), ४४, ४८ (ए), ५१ वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये) गुन्हा दाखल करून आरोपी नरसिंहा सत्यमा धोटी, (वय-४० वर्ष, रा.ठी-नालगोंडा, तेलंगणा), शिवा मल्लेश आडप, (वय १८ वर्ष, रा.ठी- यादरी, तेलंगणा), रवी वसंत भोईर, वय ५४ वर्ष, रा.ठी मुलुंड, मुंबई) अरविंद चौतुराम गुप्ता, वय-२६ वर्ष, रा.ठी- मुंब्रा, ठाणे) यांना अटक करण्यात आली.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-१) प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त (कुलाबा विभाग) शशिकिरण काशिद, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमित देवकर, अभिजीत भोसले, पोलीस उपनिरीक्षक रूपेशकुमार भागवत, हवालदर प्रशांत सावंत, प्रतोद नाईक, अंमलदार प्रविण यादव, मुरली चौधरी, प्रकाश बारी यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!