police varata

Man dismissed from Mumbai Police arrested

मुंबई पोलीस खात्यातून बडतर्फ केलेल्याला डोंबिवलीत अटक;


बोगस क्राईम ब्रँच पोलीस अधिकारी बनवून पानटपरीवाल्याकडून गुगल पेद्वारे घेतले ८ हजार ४०० रुपये

मुंबई : मुंबई पोलीस खात्यातून बडतर्फ केलेल्या एकाला अटक करण्यात आली. या आरोपीने बोगस क्राईम ब्रँचचा पोलीस अधिकारी असल्याचे भासवून पानटपरीवाल्याकडून गुगल पे द्वारे 8 हजार 400 रुपये घेतले होते. उत्तम केशव मोरे (वय 53) असे आरोपीचे नाव असून आझाद मैदान पोलिसांनी त्याला डोंबिवलीतून अटक केली आहे.

  30 डिसेंबर 2024 रोजी रात्री 9:30 ते 10:00 च्या दरम्यान पानटपरी चालक सुरेश बराई (वय 40) यांना मोरे याने क्राईम ब्रँचचा पोलीस असल्याचे सांगून पानटपरी चालविण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा केली. त्यानंतर, फिर्यादींना क्राईम ब्रँच कार्यालयात घेऊन जाण्याचे सांगून भायखळा येथे नेले. आरोपीने गुगल पेद्वारे सुरेश यांच्या मोबाईलमधून 8 हजार 400 रुपये टॅक्सी चालकाच्या मोबाईलवर घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात (गु.र.क्र 01/2025 कलम 318(2),319(2),204 भा.न्या.सं. 2023) गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

फसवणूक करून मुंबई पोलीस दलाची बदनामी केल्यामुळे आरोपीला त्वरित अटक करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या. त्यानुसार परिमंडळ- 1 चे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नील्मा कुलकर्णी, पोलीस निरीक्षक पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अरुण गायकवाड, हवालदार कटरे, अंमलदार मुंढे, किर्तकर, माने, गोपीनाथ पाटील यांनी तपास केला. तपासादरम्यान आरोपी उत्तम मोरे याला डोंबिवलीतील लोढा हेरिटाज येथून अटक केली.

आरोपीवर अनेक गुन्हे दाखल

या आरोपीवर मुंबई क्राईम ब्रँच, दहिसर पोलीस ठाणे, व माटुंगा पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. त्याला न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!