पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांच्यामुळे ७९ लाखांचा मुद्देमाल जप्त
मध्य प्रदेशातून महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या दारू तस्करीचा (Madhya Pradesh-Maharashtra liquor smuggling busted) पर्दाफाश झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे जिल्ह्याच्या शिरपूर पोलिसांनी केली. या कारवाईत विदेशी दारूसह ७९ लाख २९ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
रात्रीच्या वेळेस बॉडर करतात पार…
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात विविध नशेच्या पदार्थांची तस्करी सुरू असल्याची माहिती राज्य पोलीस दलाला प्राप्त झाली होती. ही बाब लक्षात घेत राज्याच्या बॉडरवर असलेल्या जिल्हा पोलीस दलांना कारवाईचे आदेश वरिष्ठांनी दिले. त्यानुसार सर्वच पोलिसांसह धुळे जिल्हा पोलीस दलही तस्करांवर लक्ष ठेवू लागले. पोलिसांची शोधमोहीम सुरू असताना रात्रीच्या वेळी बॉडर पार करून मोठ्या प्रमाणात दारूसाठा येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्या माहितीच्या आधारे शिरपूर पोलिसांनी सापळा लावला. मध्य प्रदेशकडून बोराडी-वाडीमार्गे आलेले आयशर वाहन थांबवण्यासाठी पोलिसांनी चालकाला इशारा दिला. मात्र त्याने वाहन सुसाट पळवले. पोलिसांनीही पाठलाग सुरू केला. अंधाराचा फायदा घेत बोराडी गावाच्या अलिकडे वाहन उभा करून चालकाने पळ काढला.
ही दारू केली जप्त….
पाठलाग करत पोलिसांचे पथक बोराडी गावाजवळ आले असता त्याना दारूने भरलेले वाहन आढळून आले. त्यात रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट, रॉयल चॅलेंज व मॅकडॉवल्स नं.१ कंपनीची व्हिस्की असा विविध कंपनीचा विदेशी दारू आढळली. तसेच कारवाईदरम्यान तस्करीसाठी वापरलेले वाहनदेखील पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणी शिरपूर शहर पोलिसांनी ६५ (अ), ६५ (ई), ८० (१) (२), ८३ सह भादंवि कलम २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.
यांनी केली कारवाई…
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर, पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, संदिप दरवडे, हेमंत खेरणार व गणेश कुटे तसेच डी. बी. पथकाचे हवालदार ललीत पाटील, प्रेमसिंग गिरासे, अंमलदार रविंद्र आखडमल, प्रमोद ईशी, योगेश दाभाडे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, भद् साळुंके, सचिन वाघ, मनोज दाभाडे, मनोज महाजन, प्रशांत पवार, दिपक खैरनार, विवेकानंदन जाधव, भुपेश गांगुर्डे, मोहन सुर्यवंशी, सुशिलकुमार गांगुर्डे, शांतीलाल पावर व रविंद्र महाले, होमगार्ड मिथुन पवार, शरद पारधी व चेतन भावसार यांनी केली.