बदलापूर रेल्वे स्थानकावर शौर्य दाखवणाऱ्या एमएसएफ, आरपीएफच्या जवानांचा गौरव
वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्तांकडून प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक प्रदान
मुंबई : बदलापूर रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेल्या एमएसएफ व आरपीएफ कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या धाडसाचा गौरव वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त, मुंबई यांनी केला आहे. आज, १२ डिसेंबर रोजी मुंबई येथील वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त कार्यालयात एमएसएफ कर्मचारी प्रमोद चव्हाण आणि विकास पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
काय आहे प्रकरण?
५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता बदलापूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 01A वर एक धक्कादायक घटना घडली. विकास नाना पगारे नावाच्या व्यक्तीने आपल्या तीन मित्रांवर देशी पिस्तूलातून दोन फायर केले. फायरिंगनंतर तो घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना, कर्तव्यावर असलेल्या एमएसएफ कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता गोळीबार करणाऱ्याला पकडले. या शौर्यपूर्ण कृतीमुळे मोठा अनर्थ टळला आणि आरोपीला पुढील कारवाईसाठी कल्याण जीआरपीच्या ताब्यात देण्यात आले.
गौरव समारंभात सत्कार
या शौर्यपूर्ण कार्याबद्दल वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्तांनी प्रमोद चव्हाण आणि विकास पाटील यांचा प्रशस्तीपत्र आणि १ हजार रुपये रोख देऊन सन्मानित केले. तसेच त्यांचे धाडस, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यदक्षतेचे कौतुक केले व त्यांना इतरांसाठी प्रेरणादायी असे संबोधले.
सन्मान कर्तव्याचा
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एमएसएफ आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांचे धाडस आणि तत्परता महत्त्वपूर्ण आहे. त्यांची जागरूकता आणि शौर्यामुळे प्रवाशांचे जीवन सुरक्षित राहते. असे कर्मचारी हे समाजासाठी प्रेरणास्थान आहेत.