गोव्यातून पळवलेली कार शिर्डीत जप्त
नॅशनल पोलीस ग्रुपमधील मुंबई पोलीस अधिकाऱ्याचे मोलाचे योगदान
मुंबई : मुंबई पोलीस दलाचे अधिकारी, अंमलदार कायम सतर्क असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्याला निमित्त ठरले गोव्यातून पळवलेली कार! ही कार अवघ्या ४० मिनिटांत जप्त करण्यात आली. या गुन्ह्याची उकल करण्यात नॅशनल पोलीस ग्रुपमध्ये (National Police Group) महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई पोलीस (mumbai police) दलातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याने माेलाचे योगदान दिल्याने शिर्डी पोलिसांना कार जप्त करण्यात यश आले.
गुन्ह्याचा घटनाक्रम
पर्यटनासाठी येणाऱ्यांना गोव्यात फिरण्याकरिता भाडेतत्वावर कार दिली जाते. अशाच प्रकारे प्रतिदिनी १ हजार २०० रुपयांना दिलेली कार एका व्यक्तीने पळवली. कार पळवणारा गोव्या राज्याच्या सीमेलगतच्या चेकपोस्टवर न थांबता सुसाट निघून गेला. या प्रकरणी त्या कारच्या क्रमांकानुसार १२ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. हे माहीत पडताच कार पळविल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी वास्को पोलीस ठाण्यात (गु.र.क्र. २०/२०२४) भादंवि कलम ४०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याची माहिती संबंधित पोलिसांनी नॅशनल पोलीस ग्रुपवर दिली. माहिती समजताच मुंबईच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याने तांत्रिक माहितीच्या आधारे तपासचक्र सुरू केले आणि कारची माहिती शिर्डी पोलिसांना दिली. त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, अंमलदार जरड, शेख यांनी सापळा लावून कारचालक आदेश राजेंद्र कुमार याला ताब्यात घेतले. त्याला पुढील तपासासाठी रितसर कारसह गोव्याच्या वास्को पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
‘एनपीजी’ची देशभरातील पोलिसांना होते मदत
एका राज्यात चोरी करून आरोपी परराज्यांमध्ये पळ काढतात. हे लक्षात येताच देशभरातील स्मार्ट पोलिसांनी एकत्रित येत सोशल मीडियावर नॅशनल पोलीस ग्रुप सुरू केला. चोरी असो वा खून अथवा इतर कोणताही गुन्हा… गुन्ह्याची माहिती ग्रुपवर मिळताच सर्वजण आपापल्या परीने कामाला लागतात आणि आरोपी आपल्या हद्दीत आहे का याचा मागोवा घेतात. या कार्यपद्धतीमुळे आतापर्यंत हजारो गुन्ह्यांची उकल झाली असून याचे सर्वश्री श्रेय नॅशनल पोलीस ग्रुपला व त्यातील कर्तव्यदक्ष पोलिसांना जाते. या स्मार्ट पोलिसांना ‘पोलीसवार्ता’ टीमचा सलाम!