१९ गुन्ह्यांची उकल करणाऱ्या गुन्हे शाखा २ च्या पोलिसांचा सन्मान
ठाणे : गुन्हे प्रकटीकरण शाखा घटक २ च्या पथकाचा ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला. या सुवर्ण क्षणाला निमित्त ठरले १९ गुन्ह्यांची केलेली उकल!
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झाल्या प्रकरणी (गु.र.क्र. १०७९/२०२३) भादंवि कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. वारंवार घडणाऱ्या या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आरोपींना त्वरित अटक करण्याची सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार गुन्हे शाखा घटक-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गोपनीय सुत्राकडून मिळालेल्या बातमीचे आधारे, सराईत इराणी टोळीतील सक्रिय सदस्य आणि अट्टल सोनसाखळी चोर अब्बास शब्बर जाफरी (वय २३ वर्षे, रा. ठि. रूम नंबर १, पहीला माळा, अय्याज बिल्डींग, खान कंम्पाउंड, मुंना बिल्डींगच्या बाजुला, शांतीनगर, भिवंडी, जि. ठाणे) याला अटक करण्यात आली.

२३ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त
चौकशीदरम्यान आरोपी अब्बास याने आतापर्यंत केलेल्या सोनसाखळी चोरीसह मोटारसायकल व मोबाईल फोन चोरीच्या १९ गुन्ह्यांची कबुली दिली. तपासादरम्यान ३०६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ३ दुचाकी, ४ मोबाईल फोन असा एकूण २३ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या पोलीस ठाण्यातील गुन्हे उघड
हा आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने नारपोली, कापूरबावडी, बदलापूर पूर्व, भिवंडी, हिललाईन, वर्तकनगर, कासारवडवली, मध्यवर्ती, चितळसर, कळवा, वागळे इस्टेट, महात्मा फुले चौक, खडकपाडा या पोलीस ठाण्यांमधील दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक २, भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन गायकवाड, सपोनि धनराज केदार, सपोनि सचिन ढोके, सपोनि श्रीराज माळी, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र चौधरी, निसार तडवी, हनुमंत वाघमारे, सपोउपनि रविंद्र पाटील, राजेश शिंदे, हवालदार अमोल देसाई, सुनिल साळुंखे, देवानंद पाटील, मंगेश शिर्के, रंगनाथ पाटील, साबीर शेख, किशोर थोरात, शशीकांत यादव, सचिन साळवी, वामन भोईर, राजेंद्र राठोड, प्रकाश पाटील, सचिन सोनावणे, श्रेया खताळ, माया डोंगरे, अंमलदार सचिन जाधव, अमोल इंगळे, उमेश ठाकुर, जालींदर साळुंके, भावेश घरत, नितीन बैसाणे, चापोशि / रविंद्र साळुंके यांनी केली.