पनवेल सायबरच्या पोलिसांची वसई-विरारमध्ये कारवाई
नवी मुंबई : उत्तर प्रदेश, राजस्थानसह अन्य राज्यातील मुलांना कामासाठी बोलावून त्यांच्या कागदपत्रांद्वारे बँकेत खाते उघडून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळी पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई नवी मुंबई शहर पोलीस आयुक्तालयाच्या पनवेल सायबर सेलच्या पथकाने केली. या कारवाईत ५२ डेबिट कार्ड, १८ मोबाईल, १७ चेकबूक, १५ सिमकार्ड, ८ आधारकार्ड, ७ पॅनकार्ड, ३ ड्रायव्हिंग लायसन्स, २ वोटर आयडी कार्ड, बनावट व्यवसाय व्हीजीटींग कार्ड जप्त करण्यात आले.
न्हावाशेवा येथे राहणारे फिर्यादी यांना सोशल मिडीया TINDER अॅप वरून Emily नावाच्या महिलेने फिर्यादी यांना संपर्क करून त्यांना चांगल्या परताव्याच्या गुंतवणुकीचे आमिष दाखवुन फिर्यादीचे मोबाईल व्हॉटसअॅप नंबरवर www.flowertra.comही लिंक पाठवुन त्यामध्ये त्यांचे खाते ओपन करण्यास सांगुन फिर्यादीची एकुण १०,४०,२१२/- रक्कम वेगवेगळ्या बनावट बैंक अकाउंटमध्ये घेवुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली. या प्रकरणी न्हावाशेवा पोलीस ठाण्याचे गु.र.क. क. ३१८ (४) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (ड) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास पनवेल सायबर सेलचे पथक करू लागले.तांत्रिक माहितीचा आधारे'वसई-विरार' येथे बनावट बैंक अकाउंट बनविणारी एक टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना समजली.त्या नुसार'पनवेल सायबर सेल' पथकाने वसई रेल्वे स्टेशनपासून १०० मीटर अंतरावर असणाऱ्या बिल्डींगमधील एका शॉपवर कारवाई केली असता, तेथे एकूण ९ मुले मिळून आली. त्यापैकी सुधीर जैन व संदेश जैन यांच्या बॅगेमध्ये ५२ वेगवेगळ्या बँकांचे डेबिट कार्ड, १८ मोबाईल, १७ चेकबुक, १५ सिमकार्ड, ८ आधारकार्ड,७ पॅनकार्ड, ३ ड्रायव्हिंग लायसन्स, २ वोटर आयडी कार्ड, बनावट व्यवसाय व्हीजीटींग कार्ड मिळाले.

अशी करायचे फसवणूक
योगेश जैन व हिमांशू सेन हे अनुक्रमे सुधीर जैन व संदेश जैन हे खोटे नाव धारण करून त्यांचे इतर साथीदारांशी संगन मत करून वसई विरार गोरेगांव इत्यादी ठिकाणी शॉप भाड्याने घेऊन तेथे कामासाठी आलेल्या मुलांच्या नावाने वेगवेगळ्या बँकांचे अकाउंट ओपन करत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच मुलांच्या नावे बनावट भाडेकरार बनवून, बनावट पोलीस व्हेरिफीकेशनची कागदपत्रे बनवून बँकांमध्ये व्यवसायांचे करंट अकाउंट ओपन करतात. सदर बँक अकाउंट ओपन केल्यानंतर त्याचे सिमकार्ड व डेबिटकार्ड हे ट्रेनने उदयपुर, राजस्थान येथील त्यांचे साथीदारांना पाठवून फ्रॉड करीता केला जात होता.
तपास करणारे पथक
सदर कारवाई नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), दीपक साकोरे, पोलीस उप आयुक्त प्रशांत मोहिते, एसीपी अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेल, पनवेलचे वपोनि. दिपाली पाटील, सपोनि वृषाली पवार, हवालदार प्रगती म्हात्रे, अंमलदार अतुल मोहिते, विकी भोगम, समीर साळुंखे यांनी केली.
नागरिकांना आवाहन
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयमार्फत जनतेला आवाहन करण्यात येते की, आपले पॅन कार्ड, आधारकार्ड, लिंक मोबाईल नंबर, बँक अकाउंट यांची माहिती कोणाल देऊ नका, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.2 अन्यथा अशा प्रकारे फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.