पै फ्रेंडस् लायब्ररीच्या अभ्यासिकेचा गौरव
अक्षय साळवीची यशोगाथा
मुंबई : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या पै फ्रेंडस् लायब्ररीच्या डोंबिवली पश्चिमेतील अभ्यासिकेचा आणखी एक विद्यार्थी आपल्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. अक्षय अंकुश साळवी याची नुकतीच जिल्हा न्यायालय ठाणे येथे लिपिक पदावर नियुक्ती झाली आहे.
अक्षयच्या या कौतुकास्पद यशाचा सन्मान करण्यासाठी आज डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पै फ्रेंडस् लायब्ररीचे संचालक श्री. पुंडलिक अनंत पै उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने उपस्थित तरुण वर्गाला यशाचा मार्ग दाखवला.
अक्षयने लायब्ररीच्या अभ्यासिकेत अभ्यास करून मिळवलेले हे यश केवळ त्याच्या जिद्दीचेच नव्हे, तर पै फ्रेंडस् लायब्ररीने निर्माण केलेल्या उत्तम अभ्यासिकेच्या वातावरणाचेही प्रतिक आहे. या यशामुळे लायब्ररीने अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरण्याचा मान मिळवला आहे.
पै फ्रेंडस् लायब्ररीने नेहमीच तरुणाईच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पाठबळ दिले आहे, आणि अक्षय साळवीचे यश हे त्याच ध्येयाचे फलित ठरले आहे.