फ्लिपकार्ट हबमधून लाखोंचे मोबाईल, लॅपटॉप चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
कल्याण गुन्हे शाखेने चार आरोपींना ठोकल्या बेड्या
कल्याण: फ्लिपकार्टच्या हबमधून लाखो रुपयांचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. कल्याण गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल ६ लाख ३३ हजार ६७९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाला त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, काही व्यक्ती चोरीच्या वस्तू विक्रीसाठी डोंबिवली पूर्वेच्या खंबाळपाडा रोड परिसरात येणार आहेत. यानंतर, पोलीस पथकाने सापळा रचून चार संशयितांना ताब्यात घेतले. आरोपींची नावे प्रणव रविंद्र पांचाळ (२५, रा. डोंबिवली पूर्व), प्रशांत गंगाराम शेलार (२५, रा. उल्हासनगर), अमित भीमराव राणे (३०, रा. कल्याण पूर्व) आणि अजित भीमराव राणे (२८, रा. कल्याण पूर्व) अशी आहेत.
गुन्ह्याचा प्रकार
चौकशीत आरोपींनी गेल्या तीन महिन्यांपासून चक्की नाका आणि कोळशेवाडी परिसरातील फ्लिपकार्ट हबमधून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर वस्तू चोरण्याचे कबूल केले. आरोपींनी हबमधून चोरलेल्या मुद्देमालात २३ मोबाईल फोन, २ लॅपटॉप, १ कॅनन कंपनीचा कॅमेरा, इलेक्ट्रीक फॅन, आणि विविध कंपनीचे एअर बट्स यांचा समावेश आहे. कल्याण गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेमुळे मोठ्या चोरीचा पर्दाफाश करण्यात आला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
कायदेशीर कारवाई:
सदर मुद्देमालासंदर्भात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ११३२/२०२४ अन्वये तपास सुरू आहे. आरोपींना पुढील तपासासाठी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांचे नेतृत्व
ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध १) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने केली. या पथकात सपोनि संतोष उगलमुगले, पोउपनि विनोद पाटील, आणि पोलीस कर्मचारी विलास कडु, दीपक महाजन, गुरुनाथ जरग, मिथुन राठोड, विनोद चन्ने, सतिश सोनावणे यांचा समावेश होता.