ठाण्यात सुनेला जिवंत जाळणाऱ्या ७१ वर्षीय सासूला जन्मठेप
ठाणे : २०१८ मध्ये सुनेला (daughter-in-law) जिवंत जाळणाऱ्या सासूला (mother-in-law) ठाणे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जमनाबेन मंगलदास मंगे (वय ७१ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. भा.द.वि. कलम ३०२, ४९८ (अ), ३४ अंतर्गत दोषी ठरवून ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
असा घडला होता गुन्हा
आरोपी जमनाबेन मंगे हिने तिची सुन दक्षता अशोक मंगे (वय ३० वर्षे) हिला सतत शारीरिक व मानसिक त्रास दिला. शेवटी, तिने सुनिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देत निर्दयपणे खून केला. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात (Wagle Estate Police) गु.र.नं. ७२/२०१८ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
पोलिसांनी केलेला तपास
तत्कालीन तपासी अधिकारी महिला पोलीस निरीक्षक एस.व्ही. देशपांडे आणि त्यांच्या तपास पथकाने तपासादरम्यान ठोस पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानुसार अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. देशमुख यांनी या प्रकरणाची सुनावणी करत खुनाच्या गुन्ह्यात आरोपी जमनाबेन मंगे हिला दोषी ठरवले. या खटल्यात सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलीस दलाचे कौतुक
पोलीस अधिकारी शिवाजी गवारे, हवालदार सावळे, गावीत, पोलीस अंमलदार अमोल सडेकर यांनी या गुन्ह्याच्या तपासात पुरावे गोळा करून आरोपपत्र सादर केले. या पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.