Site icon police varta

२६/११ पेक्षा मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या अल सुफाच्या दोन दहशतवाद्यांना धाडले तुरुंगात । Two Al Sufa terrorists who were preparing for a bigger terrorist attack than 26/11 were jailed

उल्लेखनिय तपासाबद्दल वपोनि हेमंत चंद्रकांत पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

ठाणे : २६/११ पेक्षा मोठे दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत असलेल्या अल सुफाच्या दोन दहशतवाद्यांना तुरुंगात धाडण्यात आले. या आरोपींचा राजस्थानच्या जयपूरमध्ये झालेल्या कटात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी महाराष्ट्रात बॉम्बस्फोट करण्यासाठी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची कबुली दिली.


जुलै २०२३ मध्ये पुणे आयुक्तालयांतर्गत असलेल्या कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चंद्रकांत पाटील कर्तव्याला होते. कोथरुडमध्ये कायदा व सुरक्षा कायम टिकवून ठेवण्यासाठी हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक रात्रीच्या वेळी गस्त घालत होते. त्यावेळी तीन जण दुचाकी चोरीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस आल्याचे लक्षात येताच त्यांनी पळ काढला. पोलिसांनी त्यापैकी दोघांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, त्यांच्या एका साथिदाराने तेथून पळ काढला. दरम्यान हाती लागलेल्या आरोपींना कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये आणले. वपोनि हेमंत पाटील यांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी स्वत:ची नावे मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय २४), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूस खान (वय २३, सध्या रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा पुणे ) असल्याचे सांगितले. पळालेल्या त्यांच्या साथिदाराबाबत विचारले असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्या राहत्या परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता, ते दोघे दीड वर्षापासून कोंढवा येथे राहत असून काहीच कामधंदा करत नसल्याचे समजले. त्यानुसार कोथरुड पोलिसांनी (गु.र.नं. १७५/२०२३ भादविसह कलम ३७९, ५११, आर्म अॅक्ट कलम ३/२५, ४/२५) गुन्हा दाखल करून दोघांना न्यायालयात हजर केले. त्या दोघांना पोलीस कोठडी सुनावण्या आली.

तपासादरम्यान, वपोनि पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली असता एक काडतूस, चार मोबाईल, लॅपटॉप, पिस्टलचे कव्हर, बनावट आधारकार्ड, ड्रोनचा बॉक्स, इलेक्ट्रिक वजनकाटा, तापमापी आढळला. घातपाती साहित्य सापडल्याने तपासी पथकाने पोलिसी खाक्या दाखवून केलेल्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. या आरोपींचा अल सुफाच्या दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे उजेडात आले.

या आरोपींनी पुणे सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी तसेच त्यांनी घातपातासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेतल्याचे उघडकीस आले. त्या दोघांनी इतर आरोपींची नावे सांगितली. त्या सर्वांचा राजस्थानमधील जयपूरमध्ये केलेल्या बॉम्बस्फोटात सहभाग असून या गुन्ह्यात ते फरार असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या आरोपींची माहिती देणाऱ्यांना दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. एकूणच या गुन्ह्याची व्याप्ती पाहता महाराष्ट्र सरकारने या गुन्ह्याचा तपास एटीएसकडे सोपवला. एटीएसच्या तपासात या गुन्ह्यातील आरोपींचा राष्ट्रीय पातळीवर संबंध असल्याने हा गुन्हा एनआयकडे वर्ग करण्यात आला.

सध्या ठाणे पोलीस दलात कर्तव्याला…

अशा प्रकारे हेमंत पाटील यांनी या गुन्ह्याचा उत्कृष्ठ रितीने तपास करून देशाविरुद्धचा दहशतवादी कट उघडकीस आणला. या स्पेशल ऑपरेशनसाठी त्यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर करण्यात आले. हेमंत पाटील यांनी आतापर्यंत गुन्हे शाखेत काम करून अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. सध्या हेमंत पाटील हे राबोडी पोलीस ठाण्यात वरीष्ठ पोलीस निरीक्षक पदी कर्तव्य बजावत आहेत.

Exit mobile version